Wednesday, March 24, 2010

आज तू अशीच निघून ये......

मला नेहमी असं वाटतं.. माणूस जन्माला येतो न तेव्हा आपल्यासोबत एक कोरी डायरी घेऊन येतो......आयुष्यात त्याला अनेक व्यक्ती भेटतात ... आणि हे प्रत्येक जण स्वतःची एक गोष्ट घेऊन येतात...मग या कोऱ्या डायरीच्या प्रत्येक पानावर एकाची गोष्ट लिहिली जाते.... असा हा प्रत्येक जण आपापल्या गोष्टीतला प्रमुख नायक/नायिका असतो.. आपल्या आयुष्यात येणाऱ्या या व्यक्तींमुळेच खरंतर आपला आयुष्य समृद्ध बनत जातं...नकळत या व्यक्ती आपल्या डायरीचा आणि पर्यायाने आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातात...आणि सुरु होते एक गोष्ट आपल्या आयुष्याची....

अशाच माझ्या डायरीच्या एका पानावरची (एका व्यक्तीची) ही गोष्ट....एका नायकाने लिहिलेली...

आज तू अशीच निघून ये, जगाची बंधनं झुगारून दे
आज नाही म्हणू नकोस, बहाणे मारून पळही काढू नकोस
प्रेम खोटा का होईना पण असा तोंडावर बोलू नकोस....
आज तू अशीच निघून ये............

रोजच्यासारखी आजही तुझी वाट पाहतोय, जागेपणीही तुझीच स्वप्नं पाहतोय
तुझ्या आठवणीत सरत जातो, अंधारात कुठेतरी चाचपडत राहतो
तुझा रस्ताही विरत चाललाय, त्या फुलांच्या पायघड्यांवरून एकदा तरी चालून ये
आज तू अशीच निघून ये ..........

कधीतरी मनाशी प्रामाणिक हो, स्वप्नांना सत्य करण्याचा प्रयत्न कर
प्रेमाचा असा खेळ करू नकोस, मुक्तपणे प्रीतीच्या सागरात तरून जा
तू माझी आहेस असा मी कधीच म्हणणार नाही , पण मी तुझाच आहे हे पटवून घेण्यासाठी एकदा तरी ये.....
आज तू अशीच निघून ये.......

तुला बरंच सांगायचं आहे , तुझ्याकडून काही ऐकायचं आहे
खूप काही मनात साठलं आहे, खोल प्रेमाच्या सरोवरात दाटलं आहे
नेहमीच तुला जे सांगायचं राहून गेलं, ते ऐकण्यासाठी आज ये.....
आज तू अशीच निघून ये.......

तुझ्यातली वास्तविकता पटते मला, वरून नाही म्हटलीस तरी आतला आवाज कळतो मला
पण कधीतरी माझाही विचार कर, मग तुझ्या मनाला एकदाच विचारून बघ
मनातला कधी मला सांगितला नाहीस तरी चालेल पण एकदा तरी माझ्यातली आतुरता घेऊन ये.....
आज तू अशीच निघून ये.......

डोळ्यातले अश्रू पुसून येऊ नकोस, एकदा तरी माझ्यासाठी त्यांना तुझ्या डोळ्यात पहायचंय
माझ्याजवळ आल्यावर माझ्याशी बोलूही नकोस, एकदाच तुला डोळे भरून बघायचंय
एवढा मात्र नक्की कर....
निघायची वेळ आधीच ठरवून येऊ नकोस, आज तरी माझ्यासाठी थोडा वेळ वेळ घेऊन ये......
आज तू अशीच निघून ये.......

Tuesday, March 16, 2010

मातेला प्रणाम!




ही एक पोवाडा प्रकारातली कविता म्हणावी लागेल .. त्या वेळेस सावरकरांच्या कविता वाचनात आल्या होत्या... त्याचा हा परिणाम असावा.. :)
==========================================
शांत सौम्य असा विसावा, मनी वात्सल्याचा ओलावा
नऊ महिने अंतरात ठेवूनि करते प्रेमाचा वर्षाव
संस्कारातूनि घडवित जाते, आई जिचे नाव
त्या मनस्वितेला प्रणाम
आमुचा त्या मातेला प्रणाम||
उदरी वाढे अंश शिवाचा, आशिर्वाद माँ भवानीचा
डोल्यातुनि विलसत होते स्वप्न उद्याचे स्वातंत्र्याचे
डोहाळे लागले जिला हाती तलवार घेण्याचे
महापराक्रमी तेजस्वी असा दिधला मराठ्यांना राजा
शिवबा ज्याचे नाव
त्या मनस्वितेला प्रणाम
आमुचा त्या मातेला प्रणाम||
चरित्रातुनि जिच्या सापडे आयुष्याचे गाणे नवे
आपल्या आचरणातुनि दिले जिने सौजन्याचे धडे
दया क्षमा शांती शिस्त यांची अखंड मुर्ती
हातातुनि घडले जिच्या प्रेमळ साने गुरुजी
त्या मनस्वितेला प्रणाम
आमुचा त्या मातेला प्रणाम||
मळवट भरला जिने आपला, अनेक सुपुत्रांच्या रक्तानी
जिच्या संरक्षणाकरिता दिली प्राणांची आहुती
विशाल हिमालय रक्षणकर्ता विलसतसे भाळी
तीन अथांग जलाशये जिच्या चरणांना स्पर्शती
त्या मंगल सुंदर महान अशा भारत भू ला प्रणाम
त्या मनस्वितेला प्रणाम
आमुचा त्या मातेला प्रणाम||
=====================================================

Saturday, March 13, 2010

सोळावं वरीस


सोळाव्या वर्षीचं प्रेम ... खरच प्रेम असता का हो...
का "crush " ... कितीक हळवे, कितीक सुंदर, ... असं खरंच वर्णन करावं लागेल..
नुकतीच शाळा संपलेली असते... शाळेत कधीही मुलांशी बोललो नाही तरी 11th च्या क्लास मध्ये आपला एक group होऊन जातो... शाळेतला जो आपला crush असतो.. त्याच्याशी सुद्धा बोलणं होतं... मग वाटतं ' अरे हा आपला crush होता ...खरंच किती हा वेडेपणा... " असं म्हणून आपण स्वतःशीच हसतो....कधी वाटतं अरे कॉलनीतला हा मुलगा खूप handsome आहे..
मग उगाचं तिथे जाण -येणं वाढतं, आरशासमोर राहणं वाढतं, ... त्या वयात प्रत्येकाला आपण खूप सुंदर आहोत असं वाटत असत... मग प्रत्येक मुलगी माधुरी दिक्षित असते आणि प्रत्येक मुलगा सलमान खान....!!!
मला आठवतंय... माझा पहिला crush होता - "Captain व्योम" मिलिंद सोमण ...पण त्याने त्या TV serial मध्ये मायावर प्रेम केलं म्हणून मी पण त्याला सोडलं... [ किती हा माज ? :) ]
ही मी केलेली पहिली कविता... I remember पळत जाऊन दीप्ती ला ऐकवली होती...
This poem is all dedicated to ‘sweet sixteen’ time of my life… for the innocence in relations, for purity of friendship, for all those memorable tickling moments which still brings lots of smiles :)
Seriously, memory is a way of holding onto the things you love, the things you are, the things you never want to lose.

सोळाव्या वर्षी एकदा तरी प्रेम करावं

दोन वर्षाचं असो, दोन दिवसाचा असो,

मनावर कोणालातरी अधिराज्य गाजवू द्यावा

सोळाव्या वर्षी एकदा तरी प्रेम करावं

चंद्र आपला सखा असावा असा एकदातरी वाटावं

कोणी शोधण्याआधी स्वतःतच हरवून जावं

स्वतःला खरच ओळखण्यासाठी आपणच कोणाचा तरी व्हावं

सोळाव्या वर्षी एकदा तरी प्रेम करावं

आपलं मन कोणाचं तरी झाल्याची जाणीव एकदा तरी व्हावी,

बागेत खुललेली गुलाबाची कळी आपलीच वाटावी,

कळीचं गुलाब झालेलं तरल रूप अनुभवावं

सोळाव्या वर्षी एकदा तरी प्रेम करावं

आई-बाबांपासून लपवून ठेवण्यासारखी एखादी तरी गोष्ट असावी,

मैत्रिणीला सांगताना ती गोड गुपित होऊन जावी,

मनाशी प्रामाणिक एकदा तरी व्हावं

सोळाव्या वर्षी एकदा तरी प्रेम करावं

स्वप्नांच्या सुखद जगात हळूच हरवून जावं,

वास्तविक जगात कधी येउच नये असं वाटावं

अव्यक्त भावनांना कधी तरी मोकळं दर द्यावं

सोळाव्या वर्षी एकदा तरी प्रेम करावं








Friday, March 5, 2010

एक फूल कवितेचं


कविता हे एक अजब रसायन आहे
चढेल त्यांना नशा आणि बाकीच्यांसाठी कागदावरची ओळ आहे
कविता म्हणजे विचारांना लावलेलं अत्तर आहे
नटलेल्या भाषेचा काव्यमय शृंगार आहे
कविता म्हणजे....
कधी गुपित मनातले, तर कधी भाव प्रेमाचे
कधी जग स्वप्नांचे, तर कधी भान वास्तवाचे
कधी गुण सौंदर्याचे, तर कधी संवाद आयुष्याचे
कधी हृदयाच्या आतली, तर कधी हृदयापर...
कधी अगदी अर्थपूर्ण, तर कधी अर्थापार....
कवितेत कधी तुम्ही असता, कधी मी असते
कारण कविता ही तुमच्या माझ्या मनातलीच एक भावना असते...

एक सुरुवात प्रवासाची ...


मुक्तछंद - एक स्पंदन मनाचं,
मनातल्या हळुवार भावनांचं,
माझ्या कवितांच्या विश्वाचं ! ! !