Thursday, September 10, 2015

ऐक ना...

मी जेव्हा एकटी असते .. तेव्हा हरवून जाते तुझ्या आठवणीत ...
तुझा चेहरा समोर येतो आणि मन भूतकाळात धावायला लागतं...

अगदी एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून सर्रकन गोष्टी जाऊ लागतात...
आणि आठवतात अनेक क्षण, अनेक ठिकाणं.....

आठवतोय तुला तो कट्टा.. जिथे आपण तासन तास बसायचो...
एकमेकांशी बोलत एकमेकात हरवायचो..
कधी गप्पा बंद झाल्या तरी शांत बसून राहायचो.. वाऱ्याचा आवाज ऐकत...

तो वारा किती उनाड्पणे स्वैर धावायचा..
जणू कोणीतरी त्याला बोलावतंय..
कोणाच्या तरी प्रेमाने, एका अनाकलनीय ओढीने वाहत राहायचा...
अगदी अनाहत .. न थांबता...

तो वारा, कट्ट्या मागचं झाड, पुढची हिरवाई, तो दुरून दिसणारा डोंगर, अस्ताला जाणारा सूर्य..
सगळे अगदी सगळे साक्षीदार होते.. त्या क्षणांचे, आपल्या गप्पांचे, उमललेल्या भावनांचे आणि.. आणि आपल्या प्रेमाचे...

आज पण मी तिथेच आहे...
तोच कट्टा, तेच झाड, तोच सूर्य, तोच डोंगर...
आज पण वारा वाहतोय.. अगदी तसाच स्वैर , उनाड...
पण आज त्याची दिशा बदललीये..त्याचा स्वरूप बदललंय...
घेऊन चाललाय मला तो ... वेगळ्या वाटेकडे..एका अनोळखी रस्त्याकडे...जिथे मला एकटीला जायचंय...

तुझ्याशिवाय जगण्याची सवय नाही रे मला...
थांब ना.. अरे... किती पुढे गेलायेस तू...
जणू तुझ्या वाटेवर मी नव्हतेच कधी...

नेहमी म्हणायसास तू..
माणूस एकता येतो आणि एकटाच जातो..
पण असं इतकं practical बोलून विरक्तपणे जगत येत का रे ?
मन, भावना, इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, याला काहीच महत्व नाही.. ?

आपण माणूस आहोत...
ह्या मनाला गरज असते.. कोणाच्यातरी आधाराची..
जीवन जगायला साथ हवी असते.. कोणाच्यातरी विश्वासाची..
कोणाच्यातरी असण्याची, कोणाच्यातरी प्रेमाची...
दु :खं आणि सुखं दोन्ही हक्काने सांगता येतील अशा एका व्यक्तीची.

तीच व्यक्ती तुझ्यात शोधत होते.....
आणि शोधता शोधता.. आणि शोधता शोधता कळलंच नाही कि कधी माझ्यात हरवून गेले...

एका क्षणी खरंचच वाटलं...सापडलास तू..
तू आता माझाच आहेस आणि माझाच राहणार...
पण दुसर्याच क्षणी सत्याचा उलगडा झाला आणि एखाद्या मृगजळा प्रमाणे तू परत दूर गेलास..

पण यावेळी कायमचा...
मला जास्त अलंकारिक बोलायचं नाही रे..
कारण भावना दुसर्यांपर्यंत पोचवणं हेच एखाद्या भाषेचं सौंदर्य आहे...

असो शहाणपणाचं, समजूतदार पणाचं पांघरून ओढून दुसर्यांसाठी आपण दूर झलो..
पण खरच संपलं का आपलं नातं...?
सांग ना...
नाही... कधीच संपणार नाही ते..
त्या नात्याला जपेन मी मनात...
आयुष्यभर प्रेम बीम नाही करत बसणार तुझ्यावर...
प्रेम करीन ते त्या क्षणांवर, त्या आठवणींवर, मनामध्ये दडून बसलेल्या एका मखमली कप्प्यावर,...

असंच टिकेल आपलं नातं..
आपल्या अंतापर्यंत कायमचं..... 



2 comments: